कोरोनामुळे बदलल्या प्रथा; पोस्ट कार्यालयात महिलांची गर्दी
। अलिबाग । वर्षा मेहता ।
श्रावण महिना सुरु झाला कि, चाहुल लागते ती सणांची. हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे हा सण बहीण-भावाच्या अतुट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाकडे जाऊन, आवर्जून भावाला राखी बांधते, मात्र यावर्षी देखील कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांनी ऑनलाईनच रक्षाबंधन साजरा करण्याचे ठरविले आहे. प्रसारमाध्यमांच्याद्वारेच भावाला शुभ संदेश पाठवणे, तसेच मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून, बहिणी भावाला ओवाळणार, शुभेच्छा देणार आहेत. तर भावाकडून हक्काची मिळणारी ओवाळणीसुद्धा यावर्षी ऑनलाईनच मिळेल, असे चित्र आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून, हातावर राखी बांधते. आपले भावाप्रति प्रेम व्यक्त करते. निस्वार्थ, प्रेमाची व्याख्या म्हणजे भाऊ-बहिणींचं हे नातं. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल कामना असते.
कोरोना काळात सोशल डिस्टंन्सिंगचा नियम आला. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील अनेक बहिणींना त्यांच्या भावाकडे जाणे शक्य होणार नाही. अशावेळी साथ असते ती पोस्ट ऑफीस आणी कुरिअर सेवा पुरविणार्यांची. अनेक महिला त्यांच्या भावांना पोस्ट आणि कुरिअरच्या माध्यमातून राख्या पाठवतात.
अलिबाग येथील पोस्ट कार्यालयात गेल्या दोन आठवड्यांपासून महिला वर्ग राखी पाठवण्यासाठी येऊ लागल्या असल्याची माहिती अलिबाग पोस्ट कार्यालयातील कर्मचार्यांनी दिली.
बाजारात पारंपारीक राख्यांना मागणी आहे. मागच्या वर्षी पेक्षा राख्या 5 ते 10 रुपयांनी महाग झाल्या असल्याचे अलिबाग येथील राखी विक्रेते सुभाष मौर्य यांनी सांगितले.
या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त राख्या आल्या आहेत. पोस्ट ऑफीसमध्ये स्पेशल राखी कव्हरही उपलब्ध आहेत. खासगी कुरिअर कंपन्यांपेक्षा पोस्टाचे दर कमी असल्यामुळे सामान्य नागरिक पोस्ट ऑफीसला प्राधान्य देतात.
-हमदुल, पोस्ट मास्टर, अलिबाग पोस्ट ऑफीस
ऑनलाईन राख्या विकल्या जात असतील व त्या परस्पर पाठवता येत असल्या तरी त्याचा कुरिअरवर परिणाम झालेला नाही. आमच्याकडे भरपुर राख्या कुरिअर करण्यासाठीआल्या आहेत.
-महेश पेणसे, पाळंदे कुरिअर्स
पोस्ट ऑफीसचे रेट-
ऑर्डीनरी पोस्ट (20 ग्रॅ.पर्यंत)- 5 रु.
स्पीड पोस्ट (50 ग्रॅ पर्यंत)- 41 रु.
रजिस्टर लेटर:
ऑर्डीनरी- 22 रु.
पोच पावती- 25 रु.
राख्यांचा ट्रेंड-
बाजारात मोठ्या प्रमाणात राख्या उपलब्ध आहेत. अनेक लोक घरगुती राख्या बनवूनही विकत आहेत. घरगुती राख्यांमध्ये रेसिननी बनलेल्या राख्यांना खुप मागणी आहे. त्याचे दर 90 ते 100 रुपये इतके आहेत. अनेक महिला भावाबरोबर वहिनीलाही राख्या बांधतात.