रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

रुग्णालयाच्या नावाचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली. कर्नाटक येथील एका प्रसिद्ध आयुर्वेद रुग्णालयात उपचार घेण्यासाठी माहिती शोधत असताना कळंबोलीतील ज्येष्ठाने ऑनलाईन व्यवहारात तब्बल 6 लाख 40 हजार रुपये गमावले.

कळंबोली येथील सेक्टर 1 मधील सोसायटीत राहणारे 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक उपचारांसाठी कर्नाटक राज्यातील नागरमोळी येथील एका रुग्णालयाची माहिती इंटरनेटवर शोधत होते. या वेळी अधिकृत रुग्णालयाच्या संकेतस्थळासारखे दिसणाऱ्या एका बनावट संकेतस्थळावरून त्यांचा संपर्क दोन संशयितांशी झाला. संशयितांनी पीडित ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईलवर डॉट एपीके स्वरूपाची फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्या फाईलमधील लिंकद्वारे बँक खात्यातून 6 लाख 40 हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली. नंतर पीडितांनी मूळ रुग्णालयाशी थेट संपर्क साधला असता, कोणतीही रक्कम प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने फसवणूक उघडकीस आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Exit mobile version