निवृत्त एसटी कर्मचाऱ्याच्या मुदतठेवीवर ऑनलाईन गंडा

महाड स्टेट बँकेतील प्रकार


| महाड | प्रतिनिधी |


सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने सेवेच्या काळात आयुष्यात जमवलेली पुंजी मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या 7 लाख 45 रु. रकमेवर ऑनलाइन कर्ज काढण्यात येऊन 7 लाख 45 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार महाड स्टेट बँकेच्या शाखेत घडला असून याबाबत स्टेट बँके च्या महाड शाखा व्यवस्थापकाने मात्र हात वर केल्याने मुदत ठेवीदारांमध्ये बँकेच्या कारभाराविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले असून बँकेच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे.

वराठी गावचे प्रभाकर शंकर गोठल हे मागील वर्षी एसटी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेली 14 लक्ष रुपयांची रक्कम त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखेत 26-8-2022 रोजी एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेवली होती. या ठेवीची मुदत संपत आल्याने महाड स्टेट बँकेच्या शाखेकडून 7-8-2023 रोजी त्यांच्या भ्रमणध्वनीवर नूतनीकरण करण्याबाबत मेसेज आला. यामुळे त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केली असता हा सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

शाखेत चौकशी करण्यासाठी प्रभाकर शंकर गोठल गेले असता त्यांच्या मुदत ठेवीच्या रकमेवर 28 डिसेंबर 2022 रोजी 1 लक्ष 30 हजार ,2 लक्ष 45 हजार ,व 3 लाख 70 हजार. असे 7 लक्ष 45 हजाराचे कर्ज ऑनलाईन काढण्यात आल्याचे दिसून आले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचे अवसान गळाले व त्याबाबत त्यांना मानसिक धक्का बसला. शाखेत 14 लक्ष रुपयांची मुदत ठेव ठेवणारे प्रभाकर शंकर गोठल यांनी मी अशा प्रकारे कोणतेही कर्ज घेतलेले नसून माझी मूळ प्रमाणपत्र ही माझ्या जवळच आहेत तर मग हे कर्ज कुणी घेतले आणि कशाप्रकारे दिले याची चौकशी करून माझ्यावर अकारण लादलेला कर्जाचा बोजा त्वरित उतरून द्यावा व माझ्या मुदत ठेवी पूर्वत कराव्या अशी मागणी त्यांनी महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे केली आहे.

याबाबत शाखा व्यवस्थापकाने हात वर केले आहेत. तुम्ही ऑनलाईन कर्ज घेतले असून तुम्हाला तुमच्या भ्रमणध्वनी वरती ओटीपी आला असेल व तो तुम्ही स्वीकारला असेल म्हणूनच हे कर्ज मंजूर झाले असेल असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न महाड स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी केला आहे. याबाबत प्रभाकर शंकर गोठल यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद खोपडे हे याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबत सायबर क्राईम शाखेकडे देखील तक्रार दाखल करण्यात येत आहे. महाड स्टेट बँकेच्या शाखेमध्ये महाड तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या तसेच भारतीय सैन्यामधून निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मुदत ठेवी या बँकेच्या शाखेत आहेत . त्या ठेवीच्या रकमा सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत संशय व्यक्त केला जात असून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

Exit mobile version