संप बेकायदेशीर असल्याचा कंपनी व्यवस्थापनाचा दावा
। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील केमट्रॉन सायन्स लेबोरेटरीज प्रा. लि. कंपनीमध्ये कामगारांच्या मागण्यांकडे व्यवस्थापन वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भारतीय कामगार सेनेने 2 एप्रिलपासून बेमुदत संप सुरू केला आहे. वेतनवाढ, डीए थकबाकी, ग्रॅच्युइटी, ओव्हरटाइमसाठी भरपाई आणि मेडिक्लेम पॉलिसीचे नूतनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
भारतीय कामगार सेनेचे सक्रिय सदस्य सचिन चव्हाण, प्रकाश घाणेकर, सिद्धेश सावंत, हरीश उतेकर, सौरभ सावंत, अक्षय यादव आणि वासुदेव उघडे यांनी व्यवस्थापनाच्या मनमानीविरुद्ध बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगार छळ आणि युनियन दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे. कामगार संघटनेच्या सदस्यांवर खोट्या आरोपांच्या आधारे निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.
दुसरीकडे, केमट्रॉन व्यवस्थापनाने संपाला बेकायदेशीर ठरवत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे. “न्यायालयाने यापूर्वीही अशा तक्रारींचा विचार करून निर्णय दिला होता. सदर तक्रार मागील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. कंपनी कायदेशीर बाबींचे पूर्ण पालन करत असून, कामगारांना वेळच्या वेळी वेतन आणि सुविधा दिल्या जात आहेत. काही कामगार संघटनांनी चुकीचे आरोप करून कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून न्यायालयाच्या निर्णयामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली असल्याचे केमट्रॉन कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.
जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत संप आणखी तीव्र करण्याचा इशारा भारतीय कामगार सेनेने दिला आहे. न्यायालयाचा निकाल आणि व्यवस्थापनाची भूमिका असूनही, कामगारांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. यामुळे या वादाला पुढे काय वळण मिळणार, याकडे मात्र संपूर्ण उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले आहे.
संप करणार्या कामगारांना त्यांच्या बेकायदेशीर संपातून बाहेर येऊन शांतता, उत्पादन आणि शिस्त राखत कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपाच्या काळात काम नाही, वेतन नाही या तत्त्वानुसार कोणतेही वेतन दिले जाणार नाही.
– आशिष श्रीवास्तव, संचालक,
केमट्रॉन सायन्स लेबोरेटरीज प्रा. लि.
केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीजमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वेतनवाढ थांबलेली आहे. हे प्रकरण कामगार उपायुक्त यांच्याकडे प्रलंबित असून, त्यांनीही कामगार आणि व्यवस्थापनाने सामंजस्याने तोडगा काढावा, असे सुचवले आहे. तथापि, कंपनी व्यवस्थापन वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील.
– प्रकाश घाणेकर, संपकरी कामगार