ऑन लाईन शॉपिंगमुळे चर्मवाद्य उद्योगाचा वाजला बॅण्ड

शासनाकडून राजाश्रय मिळण्याची गरज

| कोर्लई | राजीव नेवासेकर |

भारतीय संस्कृती, संगीत आणि कला यांना हाजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारने जी-20 परिषदेत आलेल्या विभिन्न देशांच्या प्रमुखांना त्याचे चित्ररूपी दर्शन नुकतेच दिल्लीत घडवले. यातील चर्मवाद्य निर्मिती हा त्यातीलच एक प्राचीन उद्योग असून परदेशी वस्तूच्या ऑनलाईन बाजारामुळे येथील कारागीरांवर आणि या उद्योगावर नामशेष होण्याचे संकट घोंगावत आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात अशा वाद्यांचा महत्वाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून देखील या पारंपरिक चर्मवाद्य कला आणि कारागिरांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सव जवळ असल्याने मुरूड शहरातील बाजारपेठेत गेल्या 15 वर्षांपासून येत असलेले टेम्भुर्णी सोलापूर येथील प्रसिद्ध संदीप तबला मेकर्स यांनी चर्मवाद्य बनविण्यासाठीचे दुकान महिनाभर आधी बाजरापेठेत थाटले आहे. सचिन सुभाष भोसले, अभिजित हनुमंत पवार आणि लखन पाले असे तिघे जण येथे तबला, पखवाज, नाल, ढोलकी, हार्मोनियम, डग्गा अश्या प्रकारची सर्व चर्मवाद्ये विक्री आणि दुरुस्तीच काम ही वाद्य निर्मिती क्षेत्रातील कारागीर मंडळी लीलया करीत असतात. ही आमची वडिलोपार्जित पारंपरिक कला असून संपूर्ण कुटुंब जपत आहे, असे संदीप तबला मेकर्सचे सचिन भोसले यांनी सांगितले. मुरूड, श्रीवर्धन, रोहा येथे आमच्या शाखा आहेत, असेही ते म्हणाले. यंदा आमच्या पारंपरिक वाद्यांची विक्री आणि दुरुस्तीचे प्रमाण धक्कादायक घटले आहे. 15 वर्षात असा प्रकार प्रथमच पाहत असून यंदा उत्पन्न दीड-दोन लाखावरून 50 हजारांवर येईल, अशी भीती सचिन भोसले यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवात जाखडी, बाल्या डान्स, शक्ती- तुरा असे कोकणातील विविध नृत्यप्रकार देखील मोबाईलच्या युगात कमी होत आहेत. पूर्वीच्या काळात या कलांचा गणेशोत्सव काळात मोठया प्रमाणात आंनद घेतला जात असे. परंतु आता सर्वच बदल मुळावर येण्याचे संकट गडद होताना दिसत आहे. बाहेरील देश भारतीय संस्कृती किंवा पारंपारिक कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वाढत्या ऑन लाईन वस्तूंच्या मागणीमुळे आगामी काळात मोठा धोका देशातील वस्तू आणि कलेला होऊ शकतो हे वेळीच लक्षात घ्यायला पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांपूर्वी मुरूडमध्ये व्यवसायासाठी आल्यावर चर्मवाद्य तयार करण्यासाठी रात्रपाळी करावी लागत असे. आता स्वस्त प्रकारातील चर्मवाद्य घेण्याकडे देखील ग्राहकांचा कल वाढला आहे. ग्राहकांची संख्या घटल्याने कामे कमी झाली आहेत. परिणामी सायंकाळीच दुकान बंद करावे लागत असल्याचे कारागीर अभिजित पवार, लखन तानाजी पाले यांनी सांगितले. आमच्या येथे तयार केलेली वाद्ये दर्जेदार उत्तम साहित्य वापरून तयार केली जात असल्याने टिकाऊ आहेत. हे लक्षात घायला हवे. जो व्यक्ती यातील जाणकार आहे. तो आमच्या कडील वाद्ये खरेदी करतो; परंतु अशा दर्दी माणसांची संख्या देखील कमी दिसून येते. कोरोना नंतर आर्थिक समस्या निर्माण झाल्याने देखील ग्राहकांची संख्या रोडावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या चर्मवाद्य उद्योगावर संकट येण्याचे आणखी कारण म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या अनेक कंपन्यांकडून विविध वाद्ये ऑनलाईनने मागविली जातात. प्रत्यक्षात भारतीय पारंपारिक ओरिजिनल चर्मवाद्यांचे नादमाधुर्य, सूर,गोडवा, ठेका अप्रतिम असून जगात याला तोड नाही. परंतु बाहेरील वाद्ये झटपट आणि कमी किमतीला मिळत असल्याने नादमाधुर्य आणि कला याचा विसर पडत चालला असून दिखाऊपणा वाढला आहे. नवी लाकडी ढोलकी- तीन हजार, नाल सहा ते सात हजार,पखवाज-नऊ हजार, अशा नवीन वाद्यांच्या किमती आहेत, टेम्भुर्णी येथे आमच्या घरी वर्षभर अशी वाद्ये बनविली जातात असे भोसले यांनी सांगितले. शासनाकडून देखील या पारंपरिक भारतीय चर्मवादयांना लोकाश्रय मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता दिसत असल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली. ही कला लोप पावत असल्याने शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version