। उरण । वार्ताहर ।
चिरनेर गावातील मुख्य रस्ते हे खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले होते. यामुळे नागरिकांना तसेच गावात ये-जा करणार्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. चिरनेर गावचे विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेर गावातील उद्योगपती पी.पी.खारपाटील व राजा खारपाटील यांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून काँक्रिटचे रस्ते करण्यास सुरुवात केल्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या चिरनेर गावात पेशवेकालीन जागूत श्री महागणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली शुरवीरांची भूमी आहे. त्यामुळे या गावात दरदिवशी मुंबई, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण सह इतर तालुक्यातील अनेक पर्यटक, भाविक हे चिरनेर गावाला आपआपल्या कुटुंबासह, मित्र मंडळीसह भेट देत असतात. गावातील खड्डेयुक्त रस्ते, वाढते अतिक्रमण यांचा त्रास हा गावातील नागरिकांबरोबर ये-जा करणार्या पर्यटक, भाविकांना सहन करावा लागत असल्याने त्याचा फटका हा गावातील छोटेमोठे व्यवसायिक, कला नगरातील कुंभार बांधवांना सहन करावा लागत असे. यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी यासाठी सातत्याने नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती.
चिरनेर गावच्या सरपंचपदी भास्कर मोकल यांची वर्णी लागताच त्याने गावाचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली. चिरनेर गावातील उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजा खारपाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकदिलाने माझं गाव आपला विकास या भावनेने प्रेरीत होऊन विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढून गावातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटच्या कामाला आपला हातभार लावत सुरुवात केली. चिरनेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.