नेरळमध्ये 500 कुटुंबाचा एकच बाप्पा

139 वर्षांची परंपरा

| नेरळ | वार्ताहर |

मुंबईत गिरगावमध्ये राहणारे पोतदार कुटुंब नोकरीनिमित्त नेरळला आले आणि त्यांनी सुरू केलेला पोतदार कुटुंबाचा गणपती बाप्पा 139 वर्षांचा झाला आहे. पहिल्या वर्षी बनवलेली गणेशमूर्ती आजही पोतदार कुटुंब शाडूच्या मातीपासून घडवतात. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी साधारण 500 कुटुंब नेरळला दर्शनासाठी येऊन जातात, अशी या बाप्पाची महती आहे.

नेरळसारख्या रेल्वेने जोडलेल्या गावात मुंबईच्या गिरगाव भागातून पोतदार कुटुंब वास्तव्यास आले. त्यांनी 1884 साली आपल्या घरी प्रथम गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळची गणेशमूर्ती आणि आजची मूर्तीसारखीच आहे. पोतदार कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतात. यंदा उत्सवाचे 139वे वर्ष आहे.1884 साली कुटुंबातील ज्येष्ठ पणजोबांनी आजोबांच्या जन्मासाठी भाद्रपद महिन्यातील बाप्पाला नवस केला होता. त्यामुळे पोतदार कुटुंबातील भाई म्हणजेच दत्तात्रय भास्कर पोतदार यांच्या आजोबांच्या जन्माच्या नवसाचा महगणपती म्हणून त्याची स्थापना केली होती. 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महागणपतीचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री गणेशयाग आणि सहस्र अथर्वशीर्ष आवर्तने करण्यात आली व त्यात संपूर्ण पोतदार कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. या शतक महोत्सवाचे औचित्य साधून गणेशाला सुवर्ण कळस आणि अलंकार अर्पण करण्यात आले होते.

सारीपाट खेळण्याची परंपरा
श्रीगणपतीचा पाच दिवसांचा हा उत्सव गौरीसह पारंपरिक पध्दतीनेच साजरा होत असतो. जागरणासाठी पट (सारीपाट ) खेळण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आजही जपली जात आहे. यात सर्व पोतदार कुटुंबीय सामील होतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे विसर्जनाच्या आदल्या दिवशी पहाटे लळिताचा कार्यक्रम असतो. तसेच भजन व गाण्याचे कार्यक्रमही केले जातात. बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक देखील मोठ्या दिमाखात पालखीतून काढली जाते.
Exit mobile version