एसटी स्थानकात एकच ट्यूब लाईट

महिला वर्गात भीतीचे वातावरण; सर्व ट्यूब लाईट रात्री सुरू ठेवण्याची मागणी

| नागोठणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक असलेल्या नागोठणे एसटी स्थानकातील बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी रात्री एकच ट्यूब लाईट सुरू असल्याचे शनिवारी (दि.31) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास मेढा येथे जाण्यासाठी नागोठणे स्थानकात गेलेल्या काही महिला प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे. या नागोठणे एसटी स्थानकात रात्री एकाच ट्यूब लाईट असल्यामुळे स्थानकातील बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी अंधार होत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून नागोठणे एसटी स्थानकातील सर्व ट्यूब लाईट रात्री सुरू ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारांतर्गत असलेल्या नागोठणे एसटी बस स्थानकात रात्री 10 वाजेपर्यंत एसटी बस गाड्यांची ये-जा सुरू असते. अशाचप्रकारे रोहाकडे जाण्यासाठी असलेल्या एका गाडीतून मेढा येथे जाण्यासाठी दोन महिला शनिवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास नागोठणे स्थानकात आल्या होत्या. मात्र एस टी बस येण्यासाठी वेळ लागणार असल्याने त्यांना स्थानकात थांबावे लागणार होते. मात्र त्यावेळी स्थानकातील आवारातील लाईट सुरू असल्या तरी बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी असलेल्या चार ट्यूब लाईट पैकी केवळ एकच ट्यूब लाईट सुरू असल्याने तेथे अंधार होता तसेच वाहतूक नियंत्रक कक्षाचे दरवाजेही बंद असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे किमान नागोठणे स्थानकातून रात्री इतरत्र जाणाऱ्या सर्व गाड्या गेल्याशिवाय वाहतूक नियंत्रक कक्ष सुरू ठेवावे तसेच बैठक व्यवस्थेतील सर्व ट्यूब लाईट सुरू ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांतून विशेषकरून महिला प्रवासी वर्गातून होत आहे. दरम्यान यासंदर्भात नागोठणे स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्षात संपर्क साधला असता यापुढे काळजी घेण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Exit mobile version