स्थानिकांकडून कारवाईची मागणी
| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी नोड परिसरामध्ये विविध टपऱ्यांवर खुलेआम गुटखा, पानमसाला विकला जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये परप्रांतिय मोठ्या संख्येने असल्याने त्यांची माहीती घर मालकांकडे अथवा पोलिसांकडे नसल्याने चिंतेत भर पडली आहे.
तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे वेळप्रसंगी कर्करोग होऊन जिवाला देखील मुकावे लागते. हा धोका ओळखून महाराष्ट्र शासनाने 2012 मध्ये गुटखा विक्रीवर बंदी घातली. मात्र, परराज्यातून दाखल होणारा गुटखा किराणा दुकाने, पान टपऱ्यांवर सर्रासपणे विकला जात आहे. गुटख्याबरोबर काही ठिकाणी चरस, गांजाची विक्री केली जात असल्याचीही चर्चा आहे. शाळा, पोलिस ठाणे, रुग्णालय जवळील टपरीवर गुटखा व इतर नशिली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उरण शहरातील व तालुक्यातील तरुण पिढी याच्या आहारी गेल्याचे चित्र पहायला मिळत असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. इतर तालुक्यात लाखों रुपयांचा गुटखा विकला जात असताना तो पकडला जातो. मात्र, उरणमध्ये आजतागायत गुटखा किंवा इतर नशिली पदार्थांचा साठा कधी पकडलाच गेला नाही.
उरणमधील टपरीधारक हे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवून गुटख्याची विक्री करतात. तर काहीजण दुचाकीच्या डिकीत ठेवून गुटख्याची विक्री करतात. ठराविक गोदामात गुटख्याचा साठा करून ठेवला जातो. ओळखीच्या माणसालाच त्याची विक्री करण्याची खबरदारी गुटखा विक्रेते घेतात. काही गुटखा विक्रेत्यांनी शासनाच्या गुटखा बंदीचा चांगलाच फायदा घेत चढ्या दराने त्यांची विक्री करत आहेत. 3 ते 5 रुपयांची पुडी 15 ते 20 रुपयांना विकली जात आहे.







