शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

500 मीटर परिसरात विक्री बंदीला हरताळ

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शाळा-महाविद्यालयांच्या 500 मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. पनवेल तालुक्यातील शाळा परिसरात मात्र ही बंदी पाळण्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शाळांच्या परिसरात शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची जोरात विक्री सुरू आहे.

शाळांना लागूनच पानटपर्‍यांवर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे; परंतु अशा विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे फावले असून, शाळा परिसरात बंदी असलेल्या पदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेना कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील शहरी तसेच, ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्था ज्ञानदानाचे कार्य करतात. या संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे व्यसन लागू नये याकरिता शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटरच्या आवारात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. असे असताना शासनाच्या या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही ठिकाणी खुलेआम, तर काही भागात लपूनछपून
तालुक्यातील काही शहरी तसेच ग्रामीण भागांचा समावेश पनवेल पालिकेत करण्यात आला आहे. पदपथावर टपर्‍या टाकून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांविरोधात पालिकेची कारवाई सुरु आहे. याचा धसका घेत पूर्वी शाळा, महाविद्यालय परिसरात खुलेआम तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे विक्रेते आता लपूनछपून विक्री करत आहेत.

शाळा महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखू जन्य पदार्थ विकले जाऊ नये असे आदेश आहेत. या आदेशानुसार संबंधित विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने याचा बंदोबस्त करू.

– तुकाराम सरक, शहर प्रमुख
शिवसेना (कळंबोली शहर)

शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये अशी तंबी शाळा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येते. मात्र, तरीसुद्धा विक्रेते जुमानत नसल्याने अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी आशा विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

– संतोष शुक्ला, संस्थापक अध्यक्ष,
नवी मुंबई इंग्लिश स्कूल, कळंबोली

Exit mobile version