साबरखिंड हद्दीतही खुलेआम रेती उत्खनन; प्रशासन हतबल
। अलिबाग । माधवी सावंत ।
उच्च न्यायलयाने बेकायदेशीररित्या केले जाणारे रेती उत्खनन बंद करा, असा आदेश दिला असला तरी हा आदेश धाब्यावर बसवून धरमतर, साबरखिंड हद्दीत रेती उत्खनन खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. रात्री हा सर्व रेती उत्खनन आणि वाहनाचा खेळ चालत असल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय कारवाईनंतर दोन दिवसांनी पुन्हा हे धंदे सुरु होत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
अलिकडेच धरमतर खाडीत बेकायदेशीररित्या सक्शन पंपाच्या माध्यमातून रेती उपसा केल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी तातडीने त्यावर कारवाई करीत बोटीला आग लावून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन दिवसांनी पुन्हा या धंद्यांना ऊत आला. या प्रकरणात माहिती मिळताच मुद्देमाल सापडतो. मात्र आरोपी सापडत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्यात जिल्हा प्रशासन सपशेल फोल ठरत असल्याचा आरोप अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे.
याबाबत अनेकदा तक्रारी करुनही कारवाई होत नाही. आरोपी सापडत नाही. किरकोळ कारवाईनंतर दोन दिवसांनी पुन्हा उत्खनन सुरु होते. त्यामुळे प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासत कारवाई करण्याचे ढोंग करीत असल्याचा आरोपही अॅड. ठाकूर यांनी केला आहे.
महसूल विभागात भ्रष्टाचार- अॅड. काशिनाथ ठाकूर
रोहा, तळा तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात तक्रार केल्यानंतर तेथील उत्खनन बंद करण्यात आले. मात्र अलिबाग, पेण तालुक्यातील उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. किरकोळ कारवाई करुन महसूल विभाग नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. याबाबत अनेकदा प्रांत अधिकार, तहसिल, तलाठी, सर्कज आदींकडे तक्रार देण्यात आली आहे. मात्र अधिकारी केवळ आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. यावरुन महसूल विभागात भ्रष्टाचार सुरु आहे, असे ठाम मत आहे.
भातशेती, जलचरांवर परिणाम
संक्शन पंपामुळे हाशिवरे, धरमतर, कासू, आमटेम आदी विभागातील भातशेती तसेच खाडीतील जलचरांवर परिणाम झाला आहे. सक्शन पंपामुळे खाडीत खड्डे तयार होतात. किनारपट्टी फुटून जाते. त्यामुळे खारे पाणी शेतात घुसते. परिणामी, खार्या पाण्यासोबत कांदळवनाचे बी शेतात येते. त्यामुळे शेतात कांदळवन तयार झाल्याने भातशेतीच्या जागेवर कांदळवनाचे शिक्के लागले जात आहे.
स्थानिकांमध्ये दहशत
अवैधरित्या रेती उपसा करणारे गुंड प्रवृत्तीचे असून स्थानिकांमध्ये त्यांची दहशत आहे. कोणीही त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
…तर पुन्हा कारवाई करु – प्रशांत ढगे, प्रांत अधिकारी
चोरी करण्याची सवय असल्यामुळे ते पुन्हा-पुन्हा चोरी करतात. माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई केली जाते. बोटी नष्ट केल्या जातात. रात्रीच्या वेळी अवैध धंदे सुरु असतात. पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे अनेकदा खाडीत पोहोचणे शक्य नसते. मात्र अशा परिस्थितीतही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तसेच वेळोवेळी कारवाई केली जाते. सर्व अधिकार्यांडकडून प्रामाणिकपणे कारवाई केली जाते. भविष्यात जेव्हा-जेव्हा माहिती मिळेल, त्या-त्या वेळी कारवाई केली जाईल.
धरमतर हद्दीत अवैधरित्या उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळताच अलिबाग हद्दीत नसतानाही कारवाई करण्यात आली. मुद्देमाल जप्त करण्यात आला. कायद्यानूसार ही कारवाई केली जात आहे. यामध्ये कोणतेही हितसंबंध जोपासले जात नाहीत. गौणखनिज उत्खननाला लगाम लावण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. लवकरच याबाबत शासनाचे नवे धोरण जारी होईल, त्यानूसार भविष्यात कायद्याने कारवाई केली जाईल.
विक्रांत पाटील, तहसिलदार, अलिबाग