डंपिंग ग्राऊंडला विरोध; गायगोठण परिसरातील नागरीक आक्रमक

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील गायगोठण परिसरात असलेल्या डंपिंग ग्राऊंडचा स्थानिकांना होत असलेला त्रास, घनकचर्‍यापासुन होणारी खतनिर्मीती थांबल्यामुळे झालेले कचर्र्‍याचे ढिग या बाबतीत नगरपरिषद कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्यामुळे अखेर गायगोठण परिसरातील ग्रामस्थांनी डंपिंग ग्राउंड व बंद स्थितीत असलेल्या खतनिर्मिती प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांना घटनास्थळी बोलावून नगरपरिषदेचा नियोजनशून्य व गलथान कारभार निदर्शनास आणून दिला. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेचे डंपिंग ग्राऊंड कार्यान्वीत आहे. डंपिंग ग्राउंडच्या आजुबाजुला स्थानिकांची शेती, विहिरी असल्यामुळे वार्‍यामुळे उडत आलेल्या कचरा हा शेतीमध्ये विखुरला जातो. विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. परंतु, कचरा विहिरीत पडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य रहातं नाही. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी नगरपरिषदेत लेखी निवेदन देऊन सुध्दा काही दखल न घेतल्यामुळे आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थ डंपिंग ग्राउंड दाखल झाले व येथील सत्यपरिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांना बोलवण्यात आले.

Exit mobile version