प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पथके तैनात; वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी नगरपरिषदेची मोहिम
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगरपरिषदेने अखेर धडक मोहीम हाती घेतली आहे. 10 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल 177 श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरातील विविध भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरिषदेने ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी नगरपरिषदेने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून, विशेष वाहनांच्या सहाय्याने श्वानांंना सुरक्षितपणे पकडण्यात येत आहे. पकडलेल्या श्वानांंना रानवली येथील सर्व सुविधांनी युक्त विशेष केंद्रात नेण्यात येते. तेथे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. उपचारानंतर आवश्यक ती काळजी घेऊन श्वानांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्यात येत आहे.
नगरपरिषदेच्या या धडक कारवाईमुळे श्वानदंशाच्या दहशतीखाली असलेल्या श्रीवर्धनकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. भटक्या श्वानांंची संख्या नियंत्रणात आणून शहर अधिक सुरक्षित व भयमुक्त करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, ही मोहीम सातत्याने राबवून भटक्या श्वानांच्या संख्येवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या या धडक मोहिमेमुळे लवकरच श्रीवर्धन शहरातील भटक्या श्वानांंची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येईल आणि नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळेल, असा विश्वास उपनगराध्यक्ष तथा सभापती अनंत गुरव यांनी व्यक्त केला.
मोहीम सुरू : 10 सप्टेंबरपासून.
आतापर्यंत 177 श्वानांंवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया.
रेबीज प्रतिबंधक लसीकरणही सुरू.
रानवली येथे विशेष उपचार केंद्राची सुविधा.
प्रशिक्षित पथकांकडून श्वान पकडण्याची कार्यवाही.






