| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई तुर्भे क्षेपणभूमीला मंगळवारी (दि 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, त्यांनी तात्काळ नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ड प्रभाग विभागाचे वॉर्ड ऑफिसर प्रबोधन मवाडे यांच्याशी संपर्क साधला. नवी मुंबई अग्निशामक दल यांना याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
तुर्भे येथे नवी मुंबई महानगर पालिकेचे डंपिंग ग्राऊंड असून, या ठिकाणी शहरातील कचरा तसेच हरित कचरा आणला जातो. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत डंपिंग ग्राऊंडच्या सुरक्षा व्यवस्थापनाने वाशी अग्निशमन केंद्राला ही माहिती देताच सदर ठिकाणी अग्निशमन दल दाखल झाले. तोपर्यंत आसपास धुराचे लोट उसळले होते. डंपिंग ग्राऊंड आग लागल्याने या ठिकाणी उग्र दर्प सर्वत्र पसरला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी तीन वाजण्याच्या आसपास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग धुमसत असल्याने कुलिंगचे काम उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्रप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.
शास्त्रोक्त पध्दतीने निर्माण केलेल्या घनकचर्याच्या सेलवर एका भागात हा प्रकार घडला. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी उपस्थित राहून आग पसरण्यापूर्वीच नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरून रहिवाशांना त्रास होण्याची शक्यतादेखील निर्माण झाली होती. यापूर्वीदेखील त्याठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. शहरातला घनकचरा मोठ्या प्रमाणात साठवल्या जात असलेल्या या डम्पिंगच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने पुरेपूर खबरदारी घेतली जाते. त्यानंतरही आगीच्या घटना घडत असल्याने यामागे समाजकंटकांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते.