बुद्धमूर्ती अन्यत्र हलवण्यास विरोध

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

डीएसपी बंगल्यानजीक थिबा राजाच्या कालावधीतील बुद्धमूर्ती आहे. ती मूर्ती हलवण्याबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, तेथील बुद्धमूर्ती अन्यत्र हलवू नये, अन्यथा बौद्ध अनुयायांतर्फे उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

येथील रत्नागिरी कार्यालयाच्या मागील बाजूस बुद्धमूर्ती आहे. त्या जागेत कम्युनिटी सेंटर विकसित करण्याकरिता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील बुद्धाची मूर्ती स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून एका ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना 24 डिसेंबरला चर्चेसाठी निमंत्रित केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पालिका प्रशासनाबरोबर 24 डिसेंबरला होणार्‍या चर्चेआधीच बौद्ध समाजाकडून मूर्ती स्थलांतरित करण्यास तीव्र विरोध होत आहे.

दरम्यान, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.19) पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन भूमिका स्पष्ट केली आहे. बुद्धमूर्ती येथील जागा बुद्धविहारासाठी समाजाच्या ताब्यात मिळावी, यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेने 2008 पासून मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच, या सार्‍या गोष्टींचे निरसन होईपर्यंत नवीन जागेत बुद्धमूर्ती हलवू नये, विहाराच्या बुद्धमूर्तीच्या जागेमध्ये अन्य कोणतेही बांधकाम करू नये, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

Exit mobile version