वाशी हवेली येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न

| तळा | वार्ताहर |

शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण देण्याकरिता कृषी विभाग व आत्मा तळा यांचे मार्फत वाशी हवेली येथे सेंद्रिय शेती कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस गावचे सरपंच जगन्नाथ तांडेल ,तालुका कृषी अधिकारी आंनद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी साहाय्यक गोविंद पाशीमे आत्मा बीटीएम सचिन लोखंडे गाव अध्यक्ष लक्ष्मण चिंचुलकर व सेंद्रिय गटातील शेतकरी उपस्थित होते.

अन्नधान्यांचे, फळे, भाजीपाल्याचे संकरित वाण पिकांच्या अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असले तरी या पिकांना एकाच वेळेस एकसारखे उत्पन्न येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासोबतच शेतीचा खर्च वाढतो आहे. त्यामुळे शेती किफायतशीर ठरत नाही.

शेतीवरील खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची सुरवात करण्यात आली असल्याने शेती खर्च कमी करणे सेंद्रिय शेतीमुळे शक्य होईल, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानव आणि पशुपक्षांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, कॅन्सरसारख्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते असेही त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत डॉ.पंजाबराव देशमुख जैविक नैसर्गिक शेती मिशन संकल्पना ,शेतकर्‍यांना जैविक खते, जैविक कीटकनाशके तयार करणे याविषयी कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे यांनी माहिती सांगितली तसेच सेंद्रिय पद्धतीने शेतमाल पिकवणे व त्याची विक्री व्यवस्था करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे याबाबत मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
जीवामृत, बीजामृत व दशपर्णी अर्क यांची तयार करण्याची कार्यपद्धती व उपयोग तसेच फायदे याविषयी या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
Exit mobile version