21 लाख 95 हजार 820 रुपयांची तडजोड रक्कम वसूल
। पेण । वार्ताहर ।
न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयाच्या इतिहासात मागील दशकापासून प्रकर्षाने रुढ झाला आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात दि.13 ऑगस्ट रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेण तालुक्यातील दिवाणी न्यायालयात मुख्य दिवाणी न्यायाधीश रुबिना एन. मुजावर यांच्याकडील तीन प्रकरणातील व सह.दिवाणी न्यायाधीश प्रितेश देशपांडे यांच्याकडील एक प्रकरण निकाली काढण्यात आले असून चार जोडप्याचा संसार पुन्हा फुलविण्यात यश आले आहे. लोकन्यायालयामध्ये एकूण प्रलंबित 87 दिवाणी प्रकरणांपैकी 18 दिवाणी दावे आणि फौजदारी प्रकरणातील प्रलंबित 412 प्रकरणातील 122 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून सन 2013 मधील दरखास्त या लोकन्यायालयामध्ये तडजोडीने मिटविण्यात आली.
सदर लोकन्यायालयात वादपूर्व 4749 खटल्यांपैकी 668 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, त्याद्वारे पक्षकारांना एकूण 21 लाख 95 हजार 820 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली असल्याची माहिती पेण तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा मुख्य दिवाणी न्यायाधीश मुजावर यांनी दिली आहे. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी पेण तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा मुख्य दिवाणी न्यायाधीश मुजावर यांच्यासह सह. दिवाणी न्यायाधीश प्रितेश देशपांडे सरकारी वकील सतीश नाईक, पेण वकील संघटनेचे अध्यक्ष एन. एन. म्हात्रे, सह अधिक्षिका शुभदा चव्हाण, श्रावणी मोरे, वरिष्ठ लिपिक व्ही.के. पाटील यांनी विशेष मेहनत घेऊन कामकाज योग्य पद्धतीने पार पडले. तर सदर लोकन्यायालयात पंच म्हणून अॅड. पुष्कर मोकल, अॅड. माधुरी म्हात्रे उपस्थित होते.