। नागोठणे । वार्ताहर ।
वर्षातील 365 दिवस आपल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी महिला राबत असतात. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या आनंदासाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून रोह्यातील महिला आघाडीच्यावतीने श्रावणसरी नृत्य स्पर्धा नुकतीच मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न झाली. या श्रावणसरी नृत्य स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आई पळसाई महिला मंगळागौरी ग्रुपने आपल्या उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाद्वारे तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपये व आकर्षक चषक पटकाविले. नागोठण्याजवळील आई पळसाई महिला मंगळागौरी ग्रुपमध्ये निष्ठा विचारे, सोनम शिंदे, ज्योती भालेकर, पल्लवी भालेकर, विजया भालेकर, मनीषा शेलार व सुरेखा शिंदे यांचा समावेश होता. या श्रावणसरी स्पर्धेत महिलांनी उत्तम नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेला रोहा तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.