सायबर कमांडो, योद्धा निर्माण करणार
। पालघर । प्रतिनिधी ।
सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असून अनेक नागरिक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून होणारी फसवणूक आर्थिक दहशतवाद असून नागरिकांमध्ये सायबर साक्षरता निर्माण करणे तसेच, फसवणूक झाल्यास अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याच्यादृष्टीने पालघर जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्याचे योजिले आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे 77 टक्के नागरिक आदिवासी असून मोबाईल फोन व इंटरनेटचा वापर करताना वेगवेगळ्या अमिषांना बळी पडून फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियाना अंतर्गत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिक व पोलिसांमध्ये समन्वयक म्हणून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सायबर कमांडो व सुमारे 800 सायबर योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या गावात एकत्र येऊन सायबर गुन्हे जनजागृतीसाठी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी, समाजातील बालविवाह, अंमली पदार्थांचे व्यसन अशा अपप्रवृत्ती दूर करण्याच्यादृष्टीने गावोगावी चित्रफित दाखवण्यात येणार आहे. तसेच, यासर्व विषयांवर उपस्थित होणार्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था व औद्योगिक आस्थापनांमध्ये असणार्या प्रोजेक्टरची मदत घेण्यात येणार असून नागरिकांशी थेट जनसंवाद साधून त्यांना सायबर गुन्हेगारी बाबत प्रामुख्याने अवगत करणे व सावधगिरीच्या उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत.
सायबर पोलीस स्टेशनची उभारणी
पालघर जिल्ह्यात सायबर गुन्हेची उकल प्रभावीपणे व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात पुढील महिनाभरात सायबर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विविध सायबर टूल्सने सुसज्ज असणारी सायबर लॅब उभारण्यात येणार आहे.
पालघर जिल्हा पोलिसांच्या संकेतस्थळामध्ये अमुलाग्र बदल करण्यात येत असून हे संकेतस्थळ नाविन्यपूर्ण सुविधांनी युक्त राहणार आहे.
– बाळासाहेब पाटील,
पोलीस अधीक्षक, पालघर