चरी येथील स्मारकाबाबत विस्तृत चर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (दि.22) सायंकाळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चरी येथील स्मारकाच्या जागेबाबत विस्तृत चर्चा झाली. जागेच्या प्रश्नांची सोडवणूक करून लवकरच या ठिकाणी स्मारक उभारण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.
चरी हे ऐतिहासिक स्थळ आहे. सावकाराविरोधात त्यावेळी लढा देण्यात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप पुकारण्यात आला. 1932 ते 1939 या कालावधीत हा प्रदिर्घ काळातील देशातील पहिला संप आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी शेतकर्यांच्या बाजूने वकीलपत्र घेतले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूंना भेट दिली. त्या वास्तूंच्या ठिकाणी स्मारक उभारण्यापासून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शासनाने राबविलेला उपक्रम चांगला आहे.
चरी येथे स्मारक व इतर सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन वाढीला चालना मिळेल. येथील इतिहास आजच्या पिढीला माहित होईल. त्यासाठी चरी या ठिकाणी स्मारक होणे आवश्यक आहे. चरी येथे जागा उपलब्ध करून लवकरात लवकर आपल्या माध्यमातून स्मारक उभे करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील त्यांच्या मागणीला दुजोरा देत जागेबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच स्मारक उभारून पाच कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान रामदास आठवले यांचे वेश्वी येथील निवासस्थानी आगमन होताच जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे कार्यकर्तेही उपस्थित होते.