। मुंबई | प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलवारसा जतन व संवर्धनाच्या उद्देशाने यंदा महाराष्ट्र बारव दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त, तसेच महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, रविवार दि.15 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील ऐतिहासिक बारव (पायऱ्यांची विहीर) येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील मंदिर, घाट, बारव व जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन करून भारतीय सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची स्मृती जपण्यासाठी आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक बारवांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दीपोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्हे, तालुके व गावांमध्ये असलेल्या बारवांना पारंपरिक दिवे, रांगोळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रकाशमय करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दुर्गसंवर्धन गट, विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत.
या दीपोत्सवामागील प्रमुख उद्दिष्टांमध्ये ऐतिहासिक बारवांचा शोध, नोंद व संवर्धन जनजागृती करणे, जलसंवर्धन व जलसाक्षरतेचा संदेश समाजात पोहोचवणे. सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान व जबाबदारीची भावना निर्माण करणे. ‘बारव ते भवितव्य’ हा संदेश देत, हा दीपोत्सव केवळ उत्सव नसून आपल्या जलवारशाच्या पुनरुज्जीवनाची सामूहिक चळवळ ठरत आहे.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
