| रत्नागिरी | प्रतिनिधी |
महात्मा फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेले स्वाभिमानी पत्र हाच आपला जाहीरनामा मानणाऱ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आजवर एक आंतरराज्य व एक महिला संमेलनासह महाराष्ट्रात एकूण 22 अखिल भारतीय स्तरावरील विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. याच मालिकेत विभागीय स्तरावरील संमेलने आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रा पाठोपाठ कोकणामध्ये ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीस समर्पित 1ले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि.29) खेड येथील फुले शाहू आंबेडकर साहित्य नगरीत संपन्न होत आहे.
याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रख्यात आंबेडकरी इतिहासकार व साहित्यिक ज.वि. पवार यांना मान्यवरांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत प्रा. आशालता कांबळे (मुंबई) असून सत्यशोधक विचारवंत व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत आणि पाक्षिक प्रबुद्ध भारत च्या संपादिका व ज्येष्ठ विचारवंत प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी नऊ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या या एक दिवसीय संमेलनाची कार्यक्रम पत्रिका संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिक्षण व कायदे तज्ज्ञ ॲड. तु.ल. डफळे, मुख्य संयोजक अनिल येसोंडे, विद्रोही चळवळीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुदीप कांबळे व राज्यसंघटक किशोर ढमाले यांनी जाहीर केली.







