240 शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांची माहिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील 240 शिक्षक रत्नागिरीसह सिंधुदुर्ग अशा एकूण 17 जिल्ह्यांत बदली होऊन जाणार असून, अन्य जिल्ह्यातून केवळ 53 शिक्षक रायगड जिल्ह्यात बदली होऊन येणार आहे. ही प्रक्रिया सुरु असून, तालुका स्तरावर कागदपत्रांची पडताळणी सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांच्याकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 603 शाळा असून, त्या शाळांमध्ये 95 हजार 983 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये पाच हजार 749 शिक्षक कार्यरत आहेत. त्यात 46 मुख्याध्यापक, 4 हजार 761 उपशिक्षक व 942 पदवीधर आदींचा समावेश आहे.

ग्रामविकास विभागाच्या 27 फेब्रुवारी 2023च्या सुधारित पत्रानुसार, 2017 ते 2022 पर्यंत ज्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही, त्या शिक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, 2022 मध्ये रायगड जिल्ह्यातून बदली होण्यासाठी 249 शिक्षक पात्र ठरले आहेत. त्यात मराठी माध्यमातील 237 व उर्दू शाळेतील 12 शिक्षकांचा समावेश आहे. पात्र ठरलेल्या 249 शिक्षकांपैकी नऊ शिक्षकांनी अन्य जिल्ह्यात जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 240 शिक्षकांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर सुरु झाली आहे. तालुकास्तरावर कागदपत्रांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. ही बदली गतवर्षापासून सुरु असून, या शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच अन्य जिल्ह्यांतून रायगड जिल्ह्यात येणार्‍या शिक्षकांची संख्या 53 आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 15, पालघरमधून 7, रत्नागिरी 9 व बीड, नगर अशा एकूण 17 जिल्ह्यांतून शिक्षक रायगड जिल्ह्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आह

Exit mobile version