संतापजनक! स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

। ठाणे । प्रतिनिधी ।

बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. बदलापूर पश्चिमेकडे ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास फॉरेन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी व्हॅन चालकाला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं. शिवाय ज्या स्कुल व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले ती व्हॅन अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हॅनला आरटीओ परवानगी नव्हती, तरीही त्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु होती. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version