| पनवेल | प्रतिनीधी |
नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणात पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पीडित मुलगी व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा तरुण दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. याचा गैरफायदा घेत या तरुणाने पीडित मुलीला प्रेमात पाडून जवळीक साधली. त्यानंतर त्याने एप्रिल महिन्यात पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा घेत तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला नेरूळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी या प्रकाराची माहिती नेरूळ पोलिसांना दिल्यानंतर नेरूळ पोलिसांनी या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर घटनास्थळ खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी हा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार
