22 कोटींच्या वर ‘रेकॉर्डब्रेक’ उलाढाल
| मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईच्या वाशी येथे 24 मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-2026’ प्रदर्शनाने निरोप घेताना यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. 13 दिवसांत तब्बल 22 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्योजकतेचा नवा इतिहास लिहिला.
मुंबईकरांनी 490 स्टॉल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला एक भक्कम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागराचा महापूर लोटला, ज्यामुळे आयोजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.
यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे ‘गेमचेंजर’ ठरले ते म्हणजे आयोजकांनी पुरवलेल्या नाविन्यपूर्ण सुविधा. 25 किलोमीटरच्या परिघात मोफत घरपोच सेवा देण्याचा निर्णय महत्वाचा ठरला. आमच्या हातात पिशव्यांचे ओझे नको, असे म्हणणाऱ्या मुंबईकरांनी या सुविधेमुळे पोतीभर धान्य, मसाले, सेंद्रिय गुळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मनमुराद खरेदी केली. घरपोच सुविधेमुळे खरेदीचा वेग वाढला आणि उलाढालीने 10 कोटींचा टप्पा ओलांडून थेट 22 कोटींवर झेप घेतली.
खरेदीच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष ‘क्लॉक रूम’ आणि विश्रांती कक्षाची सोय होती. कुटुंबीय खरेदी करत असताना ज्येष्ठांना येथे सुरक्षित बसता येत होते, या संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले. पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कैकपटीने वाढला. 25 किमीच्या परिघात घराच्या दारापर्यंत साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी ‘उमेद’ने यशस्वीपणे पेलली. प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यात आला.
