पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी

। निंगबो । वृत्तसंस्था ।

स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी विभागात दमदार कामगिरी करताना मलेशियाच्या गोह जिन वेई हिच्यावर तीन गेममध्ये विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. मात्र, पुरुषांच्या विभागात लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणोय व प्रियांशू राजवत या चारही खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीयांसाठी हा दिवस निराशाजनक ठरला.

आशियाई स्पर्धेतील या लढतीत सिंधूने कडव्या संघर्षानंतर विजयाला गवसणी घातली. मलेशियाच्या बॅडमिंटनपटूने पहिला गेम 21-18 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील दोन गेममध्ये भारताच्या फुलराणीने झोकात पुनरागमन केले. तिने दुसरा गेम 21-14 असा, तर तिसरा गेम 21-19 असा जिंकला.

यामुळे सिंधूला पुढल्या फेरीत प्रवेश करता आला. पी. व्ही. सिंधूसमोर पुढल्या फेरीत चीनच्या हॅन युई हिचे आव्हान असणार आहे. सिंधूसाठी ही लढत सोपी असण्याची दाट शक्यता आहे. कारण याआधी झालेल्या पाचही लढतींमध्ये सिंधूने तिला पराभूत करण्याची किमया करून दाखवली आहे.

Exit mobile version