पावसाअभावी भातशेती संकटात

| खांब | प्रतिनिधी |

यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रायगड जिल्ह्यातील भातशेतीवर मोठा परिणाम झाला असून, रोहा तालुक्यातील अनेक भागांमध्ये भातशेती पाण्याअभावी कोरडी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने भात पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे. वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली असून, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेषतः रोहा तालुक्यातील परिस्थिती बिकट झाली असून, पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत रोहा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीनिष्ठ शेतकरी बाबूराव बामणे यांनी रोहा तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी केली. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने रोहा तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही बाबूराव बामणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, भातपिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Exit mobile version