रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

मातीचे भराव, पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती धोक्यात

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यात काही दिवसापासून भातशेतीची लागवड करण्यायोग्यतेचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील भातशेतीत भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र भात लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात रोपवाटिका उपलब्ध नसल्यामुळे भाताच्या लागवडीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.

भात शेतीला अपेक्षित असणारा मान्सूनचा पाऊस फार उशिरा बरसला. त्यानंतर पुन्हा गायब झाला. त्यामुळे खरीप हंगामी शेती संकटात सापडली. आधी लांबलेल्या आणि नंतर अतिवृष्टीमुळे भाताची रोपे पार कुजून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. दोन तीन वेळा पेरणी करून देखील भात रोपांची उगवण व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर काही क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली आहे.

भात क्षेत्राला पुरतील एवढ्या प्रमाणात भाताची रोपे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे येथील शेतकरी विजय पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उरण तालुक्यात भात लागवडीच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी सांगितले. एकंदरीत निसर्गाचा लहरीपणा आणि तालुक्यात होऊ घातलेले औद्योगिकरण शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या मुळावर उठले आहे. उरण तालुक्यात चिरनेर परिसरात भात लागवडीच्या क्षेत्रात नव्याने होत असलेल्या मातीच्या भरावामुळे पुराचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह गावाकडे व शेतीकडे वळला आहे. त्यामुळे भात शेतीत साचलेले पाणी बाहेर पडत नसल्यामुळे भाताची रोपे कुजून नष्ट झाली. याशिवाय गोदामांच्या कंपाउंड वॉलच्या उंच भिंतींमुळे शेतावर पॉवर टिलर जाण्याचे सोडाच, परंतु शेतकऱ्यांनाही शेतावर जाण्यासाठी पायवाट देखील राहिलेली नाही.

गोदामे उभारताना किंवा भराव करताना संबंधित प्रशासनाने आणि गोदाम मालकांनी बाजूच्या शेतकऱ्यांच्या भात लागवडीसाठी पाण्याच्या निचराऱ्याचा विचार न करता व याबाबत बाजूच्या शेतकऱ्यांची संमती न घेताच धन दांडग्यांनी भराव करून गोदामे उभी केली आहेत. त्यामुळे परिसरातील लागवडीखाली भातशेती पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. याबाबत संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांकडे या समस्यांबाबत अनेक तक्रारी करून देखील प्रशासन व ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील शेतकरी कृष्णा अनंत म्हात्रे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमीनीवर भात पीके घेतली जात आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीच्या क्षेत्रात घट होणार असून, ही चिंताजनक बाब आहे. आजच्या परिस्थितीत पाळीव जनावरे कमी झाल्याने शेतात चालणारा नांगर दुर्मिळ झाला झाला असल्यामुळे शेतकरी पॉवर टिलरच्या साह्याने शेतीची नांगरणी करत आहेत. ठराविक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात दोन बैलांचा नांगर शेतीची नांगरणी करतांना दृष्टीस पडत आहे.

विविध उद्योगांमुळे शेती झाली नापिकी
उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक तालुका बनला आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणच्या चिरनेर, कळंबूसरे, नागाव, केगाव, चाणजे व खोपटे, कोप्रोली, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीमध्ये भात पिकांची लागवड केली जात आहे. तालुक्यात २ हजार ५०० हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे क्षेत्र आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर येथील विविध उद्योगामुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद केल्याने काही शेती नापिकी झाली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
Exit mobile version