भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु झालेल्या भात लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे भात लावणीची कामेदेखील वेगात होत आहेत.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होऊन जून अखेरपर्यंत भात लावणीची कामे सुरु होतात. जूलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही कामे पुर्ण केली जातात. मात्र यंदा पावसाने उशीरा सुरुवात केल्याने भात बियाणांची पेरणी लांबणीवर गेली आहे. भात लावणीला पंधरा दिवस उशीर झाला. पावसाने उशीरा सुरुवात केल्याने जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भात लावणीला सुरुवात झाली. परंतु दहा जूलैपासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने भात लावणीचा वेग मंदावला होता. गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप घेतली आहे. उन्हाबरोबरच रिमझीम पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात लावणीची कामेदेखील वेगाने करण्यात आली आहे. भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांसह मजूर भात लावणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहेत. आठवड्यात ही कामे पुर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

Exit mobile version