चित्रकार पराग बोरसेंना अमेरिकेतील संस्थेचा पुरस्कार

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील दहिवली येथील रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेतील संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी तब्बल दोन वेळा अमेरिकेत वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार मिळवणारी चित्रे पराग बोरसे यांनी साकारली होती. पराग बोरसे यांच्या ‘ग्रेसफुल अपेरन्स’ या चित्राची निवड जगभरातील चित्रकारांच्या चित्रांमधून करण्यात आली आहे.

पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट-कोस्ट या अमेरिकेतील संस्थेने 2021 या वर्षीच्या पेस्टल्स यू.एस.ए. या त्यांच्या 35व्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात व्यक्तीचित्रण विभागात कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांना ब्राँझ पुरस्काराने सन्मानित केले आहे. कॅलिफोर्निया स्थित असलेल्या या संस्थेच्या प्रदर्शनासाठी जगभरातून आलेल्या हजारो चित्रांपैकी सॉफ्ट पेस्टल माध्यमामध्ये साकारलेली केवळ 99 चित्रे निवडली गेली आहेत. पराग बोरसे यांचे ग्रेसफुल अपिअरन्स असे शीर्षक असलेले चित्र निवडले गेले आहे. पुरस्कार मिळविणारे ते चित्र एका मेंढपाळाचे व्यक्तीचित्रण आहे.
एकूण बावीस देशांतील चित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. भारतामधून निवडले गेलेले पराग बोरसे हे एकमेव चित्रकार आहेत. कोव्हिड-19 या जागतिक महामारीमुळे गेली दोन वर्षे हे प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात होत आहे. यापूर्वी 2018 मध्येही पराग बोरसे यांना या संस्थेने त्यांचा सर्वोच्च समजला जाणारा साऊथ-वेस्ट आर्ट मॅक्झिन हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या न्यूयॉर्क मधील संस्थेनेही त्यांच्या याच व्यक्तिचित्रणाची प्रदर्शनासाठी निवड केली होती. यापूर्वीही पराग बोरसे यांना पेस्टल-जरनल मॅक्झिन अमेरिका, इंटरनॅशनल-आर्टिस्ट मॅक्झिन ऑस्ट्रेलिया अशा अनेक संस्थांतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत लोकसत्ताने त्यांना यावर्षीच तरुण-तेजांकित पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पराग बोरसे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम बोरसे यांनी केले असल्याने त्यांच्या यशाबद्दल उदयोन्मुख चित्रकार वर्गात आनंद व्यक्त होत आहे.

Exit mobile version