विश्‍वचषकपूर्वीच पाकचे रडगाणे

भारतीय गोलंदाजी कमकूवत; फिरकीपटू अजमलची टीका

| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |

भारतात होणार्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता तमाम क्रिकेट शौकिनांना लागलेली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघही भारतात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्‍वचषकामधील सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला गोलंदाजीवरून टोमणा मारला आहे. भारतीय गोलंदाजी पाकिस्तानी फलंदाजांना अजिबात आव्हान देऊ शकणार नाही, असे अजमलने मोठे विधान केले. सामन्याआधी आतापासूनच पाकिस्तानने माइंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलने मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट आहे, असे त्याचे मत आहे. भारतीय गोलंदाजी पाकिस्तानी फलंदाजांना अजिबात आव्हान देऊ शकणार नाही, असे अजमलला वाटते. भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचे विधान करत त्याने एकप्रकारे भारताला डिवचले.


भारताची गोलंदाजी पाकिस्तानइतकी धारदार कधीच नव्हती. भारतीय गोलंदाजी नेहमीच कमकुवत राहिली आहे. अलीकडच्या काळात फक्त मोहम्मद शमी आणि सिराजनेच चांगली गोलंदाजी केली आहे. फिरकीपटूंमध्ये विश्‍वचषकात रवींद्र जडेजा महत्त्वाचा खेळाडू भारतासाठी आहे. जसप्रीत बुमराह पाकिस्तानसाठी धोका ठरू शकतो, पण तो बर्‍याच काळापासून अनफिट आहे. अशा स्थितीत भारताची गोलंदाजी पाकिस्तानसाठी फारशी धोक्याची ठरेल, असे मला वाटत नाही.

अजमल,माजी फिरकीपटू

पाक जिंकण्याची 60 टक्के शक्यता
विश्‍वचषकामध्ये पाकच्या विजयाची शक्यता 60 टक्के आहे. भारताची फलंदाजी नेहमीच मजबूत राहिली आहे. आमची गोलंदाजी मजबूत असल्याने आम्ही त्यांना मात देऊ शकतो, ही लढत बरोबरीची असेल. या क्षणी मी म्हणेन की पाकिस्तान जिंकण्याची 60% शक्यता आहे. पाकिस्तान संघ विश्‍वचषक जिंकणारा फेव्हरेट संघ आहे. भारताची परिस्थिती आणि पाकिस्तानकडे असलेले गोलंदाज पाहता जर आमच्या संघाने भारताला कमी धावसंख्येपर्यंत रोखले तर पाकिस्तान नक्की जिंकेल.

Exit mobile version