मुशीर खान दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मुशीर खानचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुशीर खान गंभीर जखमी झाला असून सध्या मुशीर खान आणि त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, अपघातात मुशीर खानला दुखापत झाल्याने किमान तीन महिने तरी त्याला मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
भारताचा युवा फलंदाज मुशीर खान कार अपघातात जखमी झाला आहे. मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान आझमगडहून लखनौला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. यावेळी मुशीर खानची कार जवळपास तीन ते चार वेळा उलटली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात त्याला फ्रॅक्चर झाले असून त्याचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. मुशीर आणि त्याचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दुखापतीमुळे मैदानापासून दूर
मुशीरची इराणी चषक 2024 साठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात निवड झाली आहे. ईराणी ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हे 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. मात्र, आता या अपघातानंतर मुशीर रणजी ट्रॉफीच्या पहिल्या काही सामन्यांपासूनही दूर राहणार आहे.
मुशीर खानची आतापर्यंतची कारकीर्द
मुशीर खानने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 15 डावात फलंदाजी करताना त्याने 51.14 च्या सरासरीने 716 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याने नाबाद 203 धावा केल्या होत्या.