द्विशतक होण्यापूर्वीच पाकिस्तानचा डाव घोषित

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला. बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात रिझवानने 171 धावा करत खेळत होता. शतक झळकावणाऱ्या सौद शकीलसोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रिझवानला द्विशतक झळकावण्याची मोठी संधी होती. पण रिझवानने द्विशतक पूर्ण करण्याआधीच कर्णधार शान मसूदने पाकिस्तानचा डाव घोषित केला. यावरून आता पाकिस्तानच्या कर्णधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर आता उपकर्णधार सौद शकीलने नेमके काय घडले हे सांगितले आहे.

रिझवान द्विशतकाच्या दिशेने असताना पाकिस्तानचा डाव घोषित करण्याच्या शान मसूदच्या या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या संघाचा उपकर्णधार सौद शकीलने शान मसूदने डाव घोषित करण्याच्या निर्णयामागचे कारण सांगितले की, संघ कधी डाव घोषित करणार आहे, हे रिझवानला आधीच माहित होते.

पाकिस्तानचा उपकर्णधार म्हणाला, जोपर्यंत रिझवान भाईच्या द्विशतकाचा प्रश्न आहे, मी हे स्पष्ट करतो की डाव घोषित करण्याचा निर्णय घाईघाईने घेतला गेला नाही. संघ नेमका कधी डाव घोषित करणार हे रिजवानला दीड तास आधीच माहीत होते. आम्ही डाव घोषित करण्यापूर्वी 450 धावांच्या आसपास आकडा गाठण्याच्या प्रयत्नात होतो. रिजवान पाकिस्तानसाठी कसोटीत तिसरा सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे.

पाकिस्तानमध्ये कसोटीत द्विशतक नाकारणे, हे पूर्वीही घडले आहे. त्यामुले पाकिस्तानात द्विशतक पूर्ण होण्याआधी डाव घोषित करणे हे ऐतिहासिक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 29 मार्च रोजी मुल्तान येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटीत भारताचा डाव 675 धावांवर घोषित करण्यात आला. तेव्हा सचिन तेंडुलकर 194 धावांवर फलंदाजी करत होता, वीरेंद्र सेहवागने 309 धावांची शानदार खेळी केली होती. राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर 194 धावांवर खेळत असताना भारताचा डाव घोषित केला होता. सचिनला फक्त द्विशतकासाठी 6 धावा हव्या होत्या. तर त्यानंतर आता या यादीत मोहम्मद रिझवानचे नावही आले आहे.

Exit mobile version