| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. भविष्यात नावाजलेली खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या अर्चना कामत हिने 24व्या वर्षी टेबल टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. अर्चना कामतने घेतलेल्या या निर्णयामुळे तिचे प्रशिक्षक अंशुल गर्गही अवाक् झाले.
भारताची हरहुन्नरी टेबल टेनिस खेळाडू म्हणून तिने आपला ठसा उमटवला होता. पण खेळापेक्षा शिक्षणाला तिने प्राधान्य दिले आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलांना टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले नसले तरी त्यांनी केलेली प्रगती लक्षवेधक होती. पदकाची आशा निर्माण करणारी वाटचाल त्यांनी केली होती. या ऑलिंपिकसाठी अर्चना कामतचा करण्यात आलेला समावेश वादाच्या भोवऱ्यात आला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सून यिंगशा हिचा पराभव करणाऱ्या अहिका मुखर्जीऐवजी अर्चनाला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. बाहेरून होणाऱ्या टीकांवर अर्चनाने लक्ष दिले नाही. तिने आपला खेळ उंचावत नेला. परिणामी, उपांत्यपूर्व फेरीत भारताचा जर्मनीकडून पराभव झाला. संघातील इतर खेळाडूंची हार झाली; परंतु एकमेव विजय अर्चनाने मिळवला होता. त्यात तिने आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या झिओना शान हिचा पराभव केला होता.