| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
पाली शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या तळ्याला आता नव्या रूपात झळाळी मिळणार आहे. पाली नगरपंचायतीच्या माध्यमातून या तळ्यातील गाळ काढण्याचे तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तळ्याच्या मध्यभागी आकर्षक कारंजे उभारण्यात येणार असून, चारही बाजूंना नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांसाठी विरंगुळ्याचे एक नवे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
पाली शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या तळ्याची गेल्या काही काळापासून दुरवस्था झाली होती. तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याचा वापर आणि परिसराचे सौंदर्य दोन्ही प्रभावित झाले होते. त्यामुळे तळ्याचा विकास करून परिसराला आकर्षक स्वरूप देण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. अखेर या मागणीची दखल घेत तळ्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
सुशोभीकरणानंतर तळ्याच्या मध्यभागी कारंजे उभारण्यात येणार असून, चारही बाजूंना नागरिकांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना येथे काही वेळ निवांत बसता येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीत नागरिकांसाठी शांत व रमणीय असे ठिकाण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाली शहराच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, मध्यवस्तीतील या तळ्याचे सुशोभीकरण हा शहरातील महत्त्वाचा विकास प्रकल्प ठरणार आहे. शहराच्या मध्यभागी नागरिकांसाठी विरंगुळ्याची जागा निर्माण होण्याबरोबरच परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. पालीच्या विकासाच्या दृष्टीने या कामाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मधली आळी परिसरातील नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले असून, तळ्याचे सुशोभीकरण सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तळ्याला आता नवे रूप मिळणार असल्याने नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.






