। सुधागड-पाली | वार्ताहर ।
अनेक वर्षांपासून पाली शहरात असलेली मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी व अवैध पार्किंग या समस्येकडे नगरपंचायत व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो वाहतुक कोंडीचा व अवैध पार्किंगचा. अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे क्षेत्र असले तरीही या शहरात गणपती देवस्थान व्यतिरिक्त इतरत्र पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने, वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाचे वाभाडे निघत आहेत.
दुकानदारांना त्रास
हाटाळेश्वर चौक, बाजार पेठ येथे वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने चालणारे पादचारी तसेच दुकांनदार त्रस्त आहेत. या अवैध पार्किंगमुळे दुकानदारांचे भांडणे हे नित्याचेच झाले आहे.
पोलिसांची कारवाई व्यर्थ
वर्षाभरापूर्वी पोलिस यंत्रणेने अवैध पार्किंग करणार्यावर कारवाई केली होती. त्यामुळे काही प्रमाणात अवैध पार्किंगला लगाम लागला होता. परंतु पोलीसांची कारवाई ही चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात असे असल्याने पुन्हा अवैध पार्किंग समस्येने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अवैध पार्किंग करणा-यांवर पोलीसांचा वचक राहिला नसल्याचे चित्र सध्या पाली शहरात पाहायला मिळत आहे.
अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आज कारवाई झाली की दुसर्या दिवशी पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळत आहे. संध्याकाळी दारू दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे व अवैध वाहनेेही उभी केली जात आहेत. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाली शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतुक पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. नागरिक वाहतुक कोंडी व अवैध पार्किंगमुळे हैराण झाले आहेत. गांधी चौक ते बाजारतळे (हटाळेश्वर चौक) या रस्त्यावर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. या रस्त्यांवर असंख्य दुचाकी उभ्या असतात त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. त्यातच पाऊस आसल्याने खुपच त्रास सहन करावा लागतो. या समस्यांकडे नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा लक्ष देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.