| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा शुक्रवारी (दि.7) सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात सुरु झालेला चैत्र पालखी सोहळा तिसर्या दिवशी रविवारी (दि.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर गोंधळ्याच्या साथीने देवीची आरती घेतल्यानंतर निर्विघ्नपणे पूर्ण झाला. पालखी सोहळा गेल्या वर्षीपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्याचे नियोजनही यशस्वी ठरले.
पालखी मंदिरात पोचल्यानंतर ग्रामदेवतेच्या पालखीला सहकार्य करणारे नागोठणे पोलीस ठाणे, नागोठणे ग्रामपंचायत, सर्व पत्रकार, वीज वितरण कंपनी, नागोठण्यातील अनेक संस्था, संघटना, सामजिक मंडळे तसेच प्रत्येक आळीतील अध्यक्ष या सर्वांचे उत्सव समितीच्या वतीने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.
उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत व पदाधिकार्यांचा भाई टके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण पालखी सोहळ्यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे नागोठणे पोलिस ठाण्यातील हे.कॉ. विनोद पाटील यांचाही उत्सव समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात अला. यावेळी नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, हरेषशेठ काळे, जयराम पवार आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी नरेंद्र जैन, भाई टके नितीन राऊत, रुपेश नागोठणेकर, मंगेश कामथे, संजय नांगरे, प्रथमेश काळे, सुदर्शन कोटकर आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.