| आगरदांडा | प्रतिनिधी |
श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्री ग्रामदैवत कोटेश्वरी मातेची पालखीची मिरवणूक कोटेश्वरी मंदिरापासून ते कुंभार वाडा, दत्तवाडी, जुनी पेठ, लक्ष्मीखार आदिंसह शहरातुन काढण्यात आली. या पालखीनिमित्त शेकडो भक्त सहभागी झाले होते. यावेळी देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी सुवासिनींनी गर्दी केली होती.
मुरुड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मंदिराचा 1970 साली जीर्णोध्दार झाला. दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यात श्री कोटेश्वरी देवीचे पूजन केले जाते. सायंकाळी कोटेश्वरी मंदिरातून देवीचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून फटाक्यांची आतषबाजी केली जाते. जागोजागी देवीची खणा-नारळानी ओटी भरून तिचे स्वागत केले जाते. पुन्हा पालखी मंदिरात आणून देवीची आरती केली जाते. दुसऱ्यादिवशी सकाळपासून यात्रेला सुरुवात होते. या यात्रेतून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळतो. तसेच, यात हजारो रुपयांची उलाढाल होते.