अनंत खैरे यांना तात्पुरता पदभार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांची पनवेल येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्या पदावर खालापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पदाचा कारभार केंद्रप्रमुख अनंत खैरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
अनंत खैरे यांनी गटशिक्षण अधिकारी पदाचा कारभार स्वीकारला असून, त्यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील आहे. दरम्यान, अनंत खैरे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रभारी गटशिक्षण अधिकारी ही परंपरा कायम राहिली असून, तालुक्याला पूर्णवेळ शिक्षण अधिकारी कधी मिळणार, हा प्रश्न शिक्षक विचारात आहेत.
कर्जत पंचायती समितीचे गटशिक्षण अधिकारी हे पद वर्ग दोन श्रेणीमधील असून, या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पास झालेले संतोष दौड हे कारभार पाहात होते. त्यानंतर त्यांची पनवेल येथे अध्यापक महाविद्यालयात बदली झाल्यानंतर कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पदाचा तात्पुरता पदभार याच महिन्यात नवनाथ साबळे यांच्याकडे देण्यात आला. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर नवनाथ साबळे यांच्यावर काही महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे असे अधिकारी आपल्या कर्जत तालुक्यातील शिक्षण संघटना या रायगड जिल्हा परिषदेमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी नवनाथ साबळे यांच्या नियुक्तीला विरोध केला. त्यामुळे अवघ्या आठ दिवसात नवनाथ साबळे यांच्याकडे असलेला गटशिक्षण अधिकारी पदाचा कारभार काढण्यात आला. आता या पदाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात केंद्रप्रमुख अनंत खैरे यांच्याकडे देण्यात आली आहे. तालुक्यातील शेलू या केंद्र असलेले अनंत खैरे यांच्याकडे याच वर्षी केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि आता त्यांना एका वर्षात थेट गटशिक्षण अधिकारी पदावर नेऊन बसविण्यात आले आहे.
केंद्रप्रमुखांकडे कारभार
अनंत खैरे हे तालुका शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख आहेत. तालुक्यात खैरे यांच्यासारखे 21 केंद्र प्रमुख असून, त्यांची श्रेणी ही तिसरी असून, शिक्षण विभागात दुसर्या श्रेणीचे दोन विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. ही दोन्ही विस्तार अधिकारी यांची पदे वर्ग दोन मधील असून, त्यांना बढती देणे आवश्यक होते. मात्र, कर्जत शिक्षण विभागात विस्तार अधिकारी असलेले पारधी आणि जाधव हे दोन्ही वरिष्ठ केंद्रप्रमुख पदावर असल्याने त्यांना विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, अनंत खैरे यांची नियुक्ती ही प्रभारी असल्याने वर्ग तीनमधील अधिकारी यांना प्रभारी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे शिक्षण विभगातून सांगण्यात आले.