दहावीच्या निकालात गतवर्षीपेक्षा एका टक्क्याने झाली वाढ; 69 विद्यालयांचा निकाल 100 टक्के
। पनवेल । वार्ताहर।
विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.27) मे जाहीर झाला आहे. पनवेल तालुक्यात यंदा इयत्ता दहावीचा निकाल 97.76 टक्के लागला आहे. मागील वर्षी पनवेलचा दहावीचा निकाल 96.53 टक्के इतका लागला असून यावर्षी एका टक्क्याने वाढ झाली आहे. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही पनवेलमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा (दि.1) मार्च ते (दि.26) मार्च या कालावधीत पार पडली. पनवेल तालुक्यातून 12524 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 12496 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 4172 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. तर 4973 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 2558 विद्यार्थी द्वितीय श्रेणी गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले. तसेच या परिक्षेत पनवेल तालुक्यातील 514 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण 12496 विद्यार्थ्यांपैकी 12217 विद्यार्थी यंदा पास झाले आहेत व 279 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार पनवेल तालुक्याचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 97.76 टक्के इतका लागला आहे. 12वीचा निकाल लागल्यावर 10वीचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी, पालकांसह अनेकांना प्रतीक्षा होती. अखेर सोमवारी दहावीचा निकाल लागला असून पनवेलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.