शैक्षणिक सहलीसाठी पनवेल आगार सज्ज

| पनवेल | वार्ताहर |

शैक्षणिक सहल उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विशेष महत्त्व आहे. शालेय जीवनात शैक्षणिक सहलीतील सहभाग हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय क्षण असतो. उपक्रमशील शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचा लाभ देण्यामध्ये स्पर्धा असते. त्यातून सहलीचे बुकिंग करण्यात येते. पनवेल आगारात सहलीसाठी बसचे बुकिंग जोरात सुरू आहे. यात शैक्षणिक सहलीसाठी पन्नास टक्के सवलत असल्याने लालपरीला पसंती दिली जात आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधूनच विद्यार्थ्यांच्या सहली काढणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. सवलतीच्या दरात सहलीकरिता विद्यार्थ्यांसाठी बस पुरविण्याचे काम एसटी महामंडळ करते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शाळांकडून बसचे बुकिंग केले जाते. पनवेल आगारातही तालुक्यातील शाळांसह पनवेल शहर व वसाहतीमधून सहलीकरीता बसचे बुकिंग सुरू झाले आहे. साधी व शिवनेरी प्रकारातील गाड्या पनवेल आगारात उपलब्ध असून दैनंदिन वेळापत्रकाचा मेळ बसवून सहलीसाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख सुजित डोळसे यांनी दिली. यंदा बसची संख्या कमी झाल्याने दररोज चार बस सहलीसाठी दिल्या जात आहेत. यंदाच्या हंगामात 14 बसचे आरक्षण झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सहलीसाठी बस फुल होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक सहलीबरोबर लग्नासाठी प्रसंगी कराराच्या गाड्याही द्याव्या लागतात. पनवेल आगाराकडे गाड्यांची संख्या कमी आहे. उपलब्ध गाड्यांवरच नियोजन करावे लागते. जास्तीत जास्त शाळांनी आगाऊ सहलीचे बुकिंग करून नियोजनासाठी सहकार्य करावे.

सुजित डोळस,
आगार व्यवस्थापक, पनवेल
Exit mobile version