| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पनवेल शहरासह तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले होते. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
पनवेल शहरातील उरण नाका परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. तसेच, शनी मंदिरासमोरील रस्ता ही पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. सततच्या पावसामुळे कृष्णाळे तलाव आणि नवीन पनवेलमधील आदई तलाव ओसंडून वाहू लागल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले होते. परिणामी परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यावेळी मुसळधार पावसामुळे गाढी नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक दुचाकी वाहने बंद पडली. वाहनचालकांना वाहने ढकलत सुरक्षित ठिकाणी न्यावी लागली, तर काही नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर आणि कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागले.
पनवेल शहर गुडघाभर पाण्यात
