आयुक्तांनी घेतला आढावा; पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यात यश
पनवेल | वार्ताहर |
कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोव्हिडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पहिल्या व दुसर्या लाटेतील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता तिसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी यासंदर्भातील पॉवर पॉईंट प्रेझेटेंशन केले. ऑक्सिजन प्लॅन्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी अधिकार्याना देण्यात आल्या.
तिसर्या लाटेत वॉर रुम अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पालिकेने उभा करावे आणि वॉर रूम अधिक बळकट करावी असे आदेश वैद्यकीय आरोग्य विभागाला आयुक्तांनी दिले. यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. प्रियांका माळी, साद देशमुख, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, स्वप्नाली चौधरी, महाले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.