शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता स्पर्धेत पनवेल मनपा राज्यात सर्वोत्तम

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नगरविकास दिनाचे औचित्य साधून गुरुवारी ( 20 एप्रिल) एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आयुक्त गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागातील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता. याकरिता महानगरपालिकेने राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले. पनवेल महानगरपालिकेने केवळ भिंती रंगवणे या कामावर भर न देता याबरोबरच शाश्‍वत सौंदर्यीकरण केले या बाबीचा निवड समितीवर प्रभाव पडला यावर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले.जलाशयांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करताना वडाळे तलावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संवर्धन व सुशोभीकरण केले. सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या या राज्यस्तरीय यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विकासकामांमुळे पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निश्‍चितच निर्माण करेल यात शंका नाही, शहराच्या विकासामध्ये सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला सदराचे यश प्राप्त करता आले.

गणेश देशमुख, आयुक्त
Exit mobile version