| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
मान्सूनच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा कायम असताना सोमवार दि.22 सकाळपासून वाढलेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि पनवेल शहरासह परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहनचालक, पादचारी आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली. तसेच, पहिल्याच जोरदार पावसाने खांदा वसाहत ते खांदेश्वर रेल्वे स्थानक जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर या खांदा वसाहत ते खांदेश्वर रेल्वे स्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या रस्त्यावर पाणी भरल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक दुचाकी पाण्यात बंद पडल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात ही अवस्था होत असेल, तर आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी बसथांब्यासमोरील पाणी निचरा व्यवस्थेची पोलखोल केली आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या मुसळधार सरींनंतर बसथांब्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पहिल्याच पावसात पनवेलकरांची तारांबळ
