आदिवासी बांधव धान्यापासून वंचित
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील शिवणसई आंबे येथील आदिवासी बांधवांना गेल्या चार महिन्यांपासून धान्य मिळाले नसल्याने पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. त्यामुळे बेजाबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिवणसई आंबे येथील रास्त भाव धान्य दुकानाचे चालक विठ्ठल पाटील यांनी दोन वेळा दुकानाचा राजीनामा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सादर केला. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या तीन महिन्याचे धान्य शिवणसई येथील दुकानात उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच हे दुकान इतर कोणत्या रास्त भाव दुकानाला जोडण्यात आले याबाबतची कोणतीही माहिती कार्डधारकांना देण्यात आलेली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गावातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या दुकानांमध्ये अनेक आदिवासी कुटुंबे आणि प्राधान्य कार्ड धारक आहेत. शिवणसई आणि आंबेतर्फे वाजे येथे आदिवासी वाड्या असून, तेथील आदिवासी रेशन धारकांना रेशन न मिळाल्याने कुटुंबामध्ये उदरनिर्वाह बाबत समस्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यात अर्ज देऊन देखील धान्य मिळाले नसल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. धान्य मिळाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे विश्वास पाटील, गावातील ग्रामस्थ, माजी सरपंच वाघमारे यांनी सांगितले आहे. यावेळी पुरवठा विभागात जाऊन चौकशी केली असता एप्रिल, मे आणि जून या महिन्याचे धान्य शिवणसई येथील दुकानात पाठवले असल्याचे सांगण्यात आले तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील धान्याबाबत विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
