विद्यार्थी, शेतकरी, क्षेत्रीय अधिकार्यांच्याशी संवाद
| रायगड | खास प्रतिनिधी |
केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. तसेच जिल्हा प्रशासनदेखील जिल्ह्याच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. जिल्ह्यात या उपक्रमांची सुरु असलेली अंमलबजावणी, याचा लाभार्थ्यांना होणारा फायदा, त्यामुळे झालेला बदल एकूणच या योजनांची फलश्रुती याची प्रधान सचिव नगरविकास (2) तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. के.एच गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पालक सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी गुरुवारी (दि. 27) रायगड जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्याआधी त्यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला. या दौर्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळा, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी, कांदा बियाणे निर्मिती उपक्रम, सामाजिक वनीकरण, बांबू रोपवाटिका येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधितांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, उपसचिव सुशिला पवार, कक्ष अधिकारी अर्जुन लांडगे यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
सर्वप्रथम रायगड जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेत, तालुका अलिबाग येथे भेट दिली. यावेळी शाळेतील शासकीय योजनांची पाहणी केली व त्यांची माहिती मुख्याध्यापक महेश ठाकूर यांच्याकडून घेतली. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, रोबोटिक व कोडींग लॅब, डिजिटल क्लासरूम, अटल टिंकरिंग लॅब यासोबत शाळेतील अनेक उपक्रमांची माहिती घेतली.
अब्दुल कलाम लॉन्च वेहिकल मिशन 2021 उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण ही मोहीम डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम यांच्यातर्फे आयोजित केली होती. या राष्ट्रीय मोहिमेमध्ये या जिल्हा परिषदेच्या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद सेस फंडातून या विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्यातील पट्टीपुलम येथे प्रक्षेपणास उपस्थित राहण्यासाठी अनुदान दिले होते. त्यामध्ये तीन विद्यार्थी, शाळेतील दोन शिक्षक व मुलांचे पालक सहभागी झाले होते. याची सविस्तर माहिती कुमारी बबिता चौहान हिने दिली. पालक सचिव गोविंदराज यांनी याचे विशेष कौतुक केले.
बांबू रोपवाटिकेची पाहणी
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार बांबू क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांनी विशेष बांबू रोपनिर्मिती मोहीम घेतली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू रोपांची निर्मिती करण्याचा नाविण्यपूर्ण प्रयोगाची पाहणी सामाजिक वनीकरणच्या रोप वाटीकेस भेट देऊन केली. रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या पाच रोपवाटिका, वनविभाग अलिबाग यांच्या 15 रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभागाच्या 13 रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या सात रोपवाटिका अशा एकूण 40 रोपवाटिकांमध्ये 28 लक्ष बांबू रोपं लागवडीचे काम सुरु करण्यात आले आहे.
राज्यात बांबू रोपवाटिका तयार करणारा रायगड जिल्हा एकमेव जिल्हा आहे. निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून बांबू आधारित उद्योगास चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधितास दिल्या.
कांदा उत्पादक शेतकर्यांच्या बांधावर
रायगड जिल्ह्यातील अलिबागचा पांढरा कांदा चवीला गोड आणि औषधी गुणांसाठी ओळखला जातो. या कांद्याची चव आणि गुणधर्म जगभरात प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या पांढर्या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन मिळाले आहे. कार्लेखिंड परिसरातील सागाव येथील कांदा उत्पादक शेतकरी सतीश पाटील यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कांदा बीज निर्मिती, कांदा लागवड, येणार्या अडचणी याबाबत चर्चा केली. या शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनातून लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल, असेही गोविंदराज यांनी सांगितले.
वरसोली किनार्याची केली पाहणी
वरसोली समुद्रकिनारा येथे भेट देऊन किनारा स्वच्छतेसाठी येणार्या बीच क्लीनिंग मशीनची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवावेत, अशा सूचना यावेळी दिल्या. जिल्हा परिषद रायगड येथे भेट देऊन नूतन कार्यालयाची पाहणी आणि रे मशीनची पाहणी केली. सेस फंडातून दिव्यांग बांधवांना दिलेल्या मोबाईल ई-शॉपला (फिरत्या वाहनावरील दुकान) भेट देऊन संवाद साधला.