। तळा । वार्ताहर ।
जी.एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा येथे पालक शिक्षक समितीच्या माध्यमातून नुकतेच पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पुरुषोत्तम मुळे होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जयदीप देवरे, फिजिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजय रायकर, झुऑलजी विभाग प्रमुख डॉ. शाहीन मिर्झा व कॉम्प्युटर विभाग प्रमुख मनस्वी वाढवळ व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य जयदीप देवरे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेताना शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर विभागात विद्यापीठ स्तरावर महाविद्यालय स्तरावर या विभागाच्या यशाची माहिती दिली. याप्रसंगी साळवी, अडखळे, भोईर, तब्सुम दांडेकर आदी पालकांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम व काही अडचणींसंदर्भात संवाद साधला असता त्यांच्या प्रश्नांना जयदीप देवरे यांनी समर्पक उत्तरे दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. मुळे यांनी विद्यापीठ स्तरावर नॅक मूल्यांकन, अविस्कर, युवा महोत्सव, आजीवन अध्ययन अशा वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. पालक व विद्यार्थी यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. संस्था, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी या चार स्तंभांवर यश अवलंबून असते. पालकांनी वेळोवेळी महाविद्यालयात येऊन पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय तरटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय रायकर यांनी केले.