धन्य धन्य हो प्रदक्षिणा…; नवनाथ आरती मंडळ चौलचा स्तुत्य उपक्रम
। चौल । प्रतिनिधी ।
निघालो घेऊन दत्ताची पालखी… असा मनी असलेला भाव, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री सद्गुरुरायाची.. असं प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसणारं समानाधान अन् दत्त दिंगबरा या हो.. स्वामी मला भेट द्या हो.. अशा आर्ततेने दत्तचरणी लीन होत केलेली दत्तमहाराजांना विनवणी, त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात, ढोल-ताशांच्या गजरात चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्तमहारांच्या डोंगराला गुरुवार, दि. 12 डिसेंबर रोजी परिक्रमा घालण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि जोडीला एका सुरात अव्याहतपणे होणारा दत्तनामाचा गजर यामुळे परिक्रमेचा मार्ग दुमदुमून गेला. भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी शेकडो दत्तभक्त उपस्थित होते.
नवनाथ आरती मंडळ चौल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या प्रतिमेची पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे चौथे वर्ष होते. या पालखी परिक्रमेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला यावेळी पायी प्रदक्षिणा घालण्यात आली.
दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी सुवासिनींकडून दत्तमहारांचे औक्षण करण्यात आले. अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता पालखी मंदिरातून मार्गस्थ झाली. स्वामी समर्थ मंदिरमार्गे, पुढे सराई, सोमेश्वर मंदिर, हनुमानपाडा, गायचोळे अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सोमेश्वर मंदिरात पालखी विश्रांतीसाठी काही वेळ ठेवण्यात आली. यावेळी चौल येथील दत्तभक्त अमेय राऊत (पूर्णब्रह्म रेस्टॉरंट) यांच्याकडून नाश्ता, नितीन पाटील (बेलोसकर) यांच्याकडून चहाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पुढे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी रामचंद्र ठाकूर (बाबू) यांच्याकडून पाणी, थंडपेय तसेच द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांच्याकडून दत्तभक्तांसाठी थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. जवळपास तीन तासांच्या मार्गक्रमणानंतर पालखीचे दत्तमंदिरात प्रस्थान झाले. महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला. प्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर, निकेश घरत, राकेश नाईक, सुनील वैद्य, निलेश माळी आणि नवनाथ आरती मंडळ, चौलच्या सभासदांनी मेहनत घेतली. या पालखी सोहळ्यादरम्यान द्वारकानाथ नाईक, चौल शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख मारुती भगत, चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
सुवासिनींकडून औक्षण
दत्त पालखीचे ठिकठिकाणी सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. यावेळी पालखी मार्गात अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दत्तभक्तांनी पालखी परिक्रमेदरम्यान पालखीवर फुलांची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दत्तमय झाल्याचे चित्र होते.









